71803976_757522418003615_6068987683179235719_n

कोण होते ते आपले ?

का त्यांच्या जाण्याच्या बातमीने मला अस्वस्थ केले. त्यांच्या जाण्यामुळे एक प्रकारची निराशा का मनात येऊ लागली ?
कुठेतरी आपलं काहीतरी नुकसान झाल्याची भावना माझ्या मनात का बर यावी ! हे जग आता पूर्वीसारखे राहणार नाही अशी धाकधूक माझ्या मनाला का बरं वाटायला लागली ? कोण होते ते माझे ?
आणि एवढा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर त्यांच्या जाण्याने का बर व्हावा?

होय मी रतन टाटांबद्दलच बोलतोय. प्रचंड विस्तार केलेल्या औद्योगिक क्षेत्राचे शिखर सर करीत आणि माणुसकीचे मूल्य जपणारे दुसरे उदाहरण भारतातच काय पण सगळ्य जगात नसावे.
मी अनेक वेळेला माझ्या भगवद्गीतेच्या व्याख्यानांमध्ये कर्मयोग शिकवताना त्यांचे उदाहरण दिलेले आहे. .

भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे.
त्यक्त्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रयः
कर्मण्यभिप्रावृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ४।२०

अर्थात आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तिचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये विलीन असला तरी वस्तूतः तो कोणतेही कर्म स्वतः करीता करीत नसतो.
हे रतनजी टाटांबद्दल म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही.

एवढेच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वाची आणि माणुसकीची आभा (aura) माझ्यासारख्या सामान्यांपर्यंत ते देखील मी काहीही न करता पोहोचते याचाच अर्थ की ती विश्वव्यापक झाली आहे. अशा अनेक अनुषंगाने आपल्या आयुष्यात रंग मिसळताना पण स्वतः न मिसळणारा, स्वतःचा रंग वेगळा ठेवणारा आणि सातत्याने माणुसकीची मूल्य बाळगूनच आपले कर्म साधणारा “विश्वरूपीच” नव्हे का.

रतनजी तुम्ही जगत असतानाच मी ही त्याच देशात श्वास घेतला आणि जगलो हे माझे भाग्य. आम्हा माणसांमध्ये राहिलात खरे पण तुम्ही खरे “रत्न” होतात हे कायम दाखवून दिलेत रतनजी.

तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली !!🙏💐